KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र / यात्रास्थळ विकास योजना • ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना पायाभुत स...

शाळेतील मुलांसाठी भाषण संग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शाळेतील मुलांसाठी भाषण संग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मे ०६, २०२१

भाषणे शाळेतील मुलांसाठी भाग - 36 (असा बालगंधर्व आता न होणे)


  असा बालगंधर्व आता न होणे 

    माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात गौरीशंकर गाठणारे युगपुरुष अनेक आहेत. आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व ही नावे जादूच्या मंत्रासारखी आहेत. या नावाच्या नुसत्या उच्चाराने आपलं मन फुलून येतं! लोकोत्तर पुरुषांविषयी बोलताना आपण कधी कंटाळत नाही. आता आपलंच पाहा- २६ जून बालगंधर्व जन्मशताब्दीपासून बालगंधर्वाविषयी आपण सारखे पाहत आहोत, वाचत आहोत आणि बोलत आहोत.

 जशा जन्मती तेज घेऊनी तारा 

जसा मोर घेऊन येतो पिसारा 

तसा येई कंठात घेऊन गाणे 

असा बालगंधर्व आता न होणे! 

      ग.दि.मां.च्या या ओळी किती सार्थ आहेत! पण म्हणून बालगंधर्व आपल्याला पूर्ण समजले असे आपण म्हणूनच शकत नाही. वेरूळ, अजिंठ्याची शिल्पं, चित्र जशी गतकाळातील सौंदर्याचे, संपत्नेचे आणि संस्कृतीचे संदर्भग्रंथ आहेत, तसे बालगंधर्व हा रसिक मराठी मनाला गवसलेला, जीवन समृद्ध करणारा एक सुंदर संदर्भ आहे. बालगंधर्वांचे खरे नाव नारायण राजहंस, बालगंधर्व ही पदवी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी लोकमान्य टिळकांनी त्यांना दिली १९०५ पासून बालगंध्वानी रंगभूमीवर किर्लोस्कर नाटक मंडळीतफे शारदा, मालिनी, शकुंतला अशा विविध भूमिका गायन आणि अभिनयातून साकार केल्या, परंतु खऱ्या गंधर्व युगाला सुरुवात झाली, ती १९११ पासून, भरजरी उंची वसं, त-हेत हेची सोन्या-मोत्यांची आभूषणे ल्यालेले गंधर्व अत्तराच्या घमघमाटात प्रवेश करीत, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होई! 'पाहताव अवयव सगळे नयनी जमले,' अशी प्रेक्षकांची अवस्था होई. बालगंधर्वाच्या गाण्याबद्दल म्या पामराने काय बोलावे! 

       उपवर रुक्मिणीचे स्वयंवर डोळ्यांनी पाहायला गेलेले प्रेक्षक रुक्मिणीकडे आपल्या कानांनी पाहत आणि डोळ्यांना जरा गप्प बसा म्हणत! त्यांचं गाणं, लय, सूर, ताल यांचा अद्भुत त्रिवेणीं संगम असे. कुठल्यातरी अज्ञात शक्तीची बोटं गंधर्वाच्या गळ्यावर फिरून गाणं उमटवत आहेत असं ऐकणाऱ्याला वाटून जात असे. त्यांच्या नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांच्या तिकिटाच्या प्रत्येक रुपयातील चौसष्टच्या चौसष्ट पैसे केवळ बालगंधर्वांना पाहण्यासाठीच असत. असे त्यांचे सहकारी सांगत. नाटककाराच्या मनातील रुक्मिणी, भामिनी किंवा सिंधू 'ती मीच या भावनेनेच ते रंगमंचावर वावरत. या कलावंताने नाट्यदेवतेला 'देह जावो अथवा राहो' या भावनेनंच आपलं आयुष्य वाहिलं. ज्यांना अन्नदाते मायबाप म्हटलं, त्या त्या प्रेक्षकांपुढे एखाद्या देवतेची मूर्ती मखरात ठेवावी अशा श्रद्धेनं एक एक नाट्यकृती सजीव करून ठेवली. एका पुरुषाला सिंधू, रुक्मिणी, सुभद्रा, मेनका, रेवती... अशा स्रीवेशात येऊन, मोहिनी टाकताना पाहणाऱ्या स्त्रियांनी देखील ते स्त्रीदर्शन नुसत मान्यच केलं नाही, तर अनुकरणीयदेखील ठरवलं.

       स्रीच्या सुभगातील सुभगदर्शनाचा आदर्श बालगंधर्व नावाचा पुरुष ठरला! पाण्यालाच तहान लागावी तशी स्त्रियाच दर्पणाला विचारीत- "सांग दर्पणा, दिसते का मी बालगंधर्वांसारखी?" ज्या अजोड भक्तिभावाने बालगंधर्व आपल्या गुरूंना सामोरे जात, त्याच भक्तिभावाने संक्रमण त्यांनी त्यांच्या प्रेक्षकांमध्ये केले. त्यांचे सर्व नाटकच नाटकाच्या चौकटीबाहेर पडन, प्रत्यक्ष जीवनाच्या प्रांतात प्रवेश करी! रंगमंचावर एवढ्या वैभवात वावरणारे बालगंधर्व त्यांच्या खाजगी जीवनात मात्र अत्यंत साधे, सरळ होते. त्यांच्या विपत्तीच्या काळी अनेकांनी त्यांना कर्ज फेडण्यासाठी मदतीचे हात पुढे केले, पण बालगंधर्वानी कधी आपल्या लौकिकाचा गैरफायदा घेतला नाही की कधी रंगदेवतेला फसविले नाही. अशा या अभिजात संगीताच्या आणि रूपसुंदर अभियानाच्या स्वप्न सरोजास त्यांच्या जन्मदिनी माझे कोटी कोटी प्रणाम. 

मे ०६, २०२१

भाषणे शाळेतील मुलांसाठी भाग - 35 (माझा आवडता कवी )


  माझा आवडता कवी 

       माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, वि. दा. सावरकर - विनायक दामोदर सावरकर हे महाराणा प्रतापांप्रमाणे देशाभिमानी देशभक्त होते. छत्रपती शिवरायांप्रमाणे धाडसी, पराक्रमी योद्धे होते. लोकमान्य टिळकांप्रमाणे एक द्रष्टे झुंजार नेते होते. पंडित नेहरूंप्रमाणे वैज्ञानिक दृष्टी असलेले थोर हळवे साहित्यिक होते. आणि आजच्या विषयासंदर्भापुरते बोलताना की सावरकर हे कवी कालिदास भवभूती, रवींद्रनाथ टागोर, शेक्सपीअर, शेले, कीट्स यांच्या तोलामोलाचे जागतिक कीर्तीने महाकवी होते. डॉ. के. ना. वाटवे, डॉ. प्र. न. जोशी, ता. गो. मायदेव यासारख्या थोर काव्यसमीक्षकांचे हे मत आहे. कमला, गोमंतक यांसारखी महाकाव्ये लिहिली म्हणून सावरकर कवी आहेतच; परंतु जीवनाचे भव्योदात्त दर्शन घडविणारे उज्ज्वल प्रतिभेचे कवी म्हणूनही सावरकर महाकवी आहेत. सावरकरांच्या काव्यात केशवसुतांचा क्रांतिकारक आदेश, गोविंदाग्रजांची उत्कटता, बालकवीचे निसर्गप्रेम, माधव ज्युलियनांचा स्वप्नाळूपणा, कुसुमाग्रजांची सात्त्विकता आणि भव्यता प्रतीत होते. 

    'हे ताऱ्यांनो जाणतसा का कुठूनही तुम्ही आला? 

कुठे चालला कवण हेतू ह्या असे प्रवासाला!"

किंवा

 'ऐश्वयें भारी । या अशा ऐश्वये भारी,

 महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी??

 दिक्षितिजांचा देदीप्य रथ तुझा सुटता, 

नक्षत्र कणांचा उठे धुराळा परता. '

यांसारख्या कविता कुसुमाग्रजांच्या पृथ्वीच्या प्रेमगीतांची आठवण करून देतात. 

ओल्या मातीत सूर्याची किरणे पिळून तिथे

 मृदू चेतन सोन्याची स्वर्ण चंपक! ही फुले 

किंवा 

'गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली

 स्वतंत्रते भगवती तुंच जी विलसतसे लाली 

    यांसारख्या सावरकरांच्या कोमल कल्पना मनावर कुठे तरी हळुवार मोरपीस फिरवून जातात. सावरकर कुटुंब हे धगधगते देशभक्त यज्ञकुंड होते. त्यांची उक्ती, कृती आणि काव्य ही मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आहुतीच होती. 

हे काय बंधू असतो जरी सात आम्ही 

त्वत्स्थंडीलात असते दिधले बळी मी ! 

त्वत्स्थंडीली ढकलली गृहवित्तमता, दावानलात वहिनी, नवपुत्र कांता ।

 त्वत्स्थंडीलीच बघ आता ममदेह ठेला ।' 

     सावकरांच्या देशभक्तीला जगात तोड नाही. मातृभूमीसाठी त्यांच्या भावना अगदी कोमल हळुवार बनतात. त्यांचे व्याकुळ मन मातृभूसाठी तळमळते, तेव्हा सहजपणे आर्त स्वर निघतात. 

ने मजसी ने परत मातृभूमीला

 सागरा प्राण तळमळला।

कधी कधी सावकरांचे शब्द व्यास-वाल्मीकींच्या सारखे दिव्य आणि प्रासादिक वाटतात. 

'की घेतले व्रत न आम्ही अंधतेने

 लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने 

जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे बुद्ध्याची वाण धरीले करी हे सतीचे ।' 

सावरकरांची धाडसी कल्पना सौम्य बनून, बारीक बारीक कलाकुसरही मोठ्या खुबीने करते आणि शब्दांचे आणि अर्थांचे अलंकार घडविते. तानाजींच्या सिंहगडावरील समाधीसंबंधी सावरकर म्हणतात. 

'मग त्या गडची भूमी ठेवी तानाजीस उदरी ।

 तेव्हापासून रत्नाकर बहु तिचा द्वेष करी ।। सावरकरांची कविता प्रतिभेचा कल्पनाविलास नसून, त्यांचे जीवनच एक उत्तुंग काव्य आहे. पराक्रमाच्या- धाडसांच्या अनेक रोमांचक क्षणांतून त्यांचे जीवन दुःख आणि यातनांच्या महासागराने भरलेले असतानाही, त्यांचे कविमन सुख-दु:खांच्याही पलीकडे जाऊन, 'कमला'सारख्या काव्यात रममाण होते.                  जगन्नाथाच्या रथाचे, रवींद्रनाथांच्या पुरस्काराचे सहर्ष स्वागत करत, आकांक्षांनी फुलून जाते. ही महानता अवर्णनीय, चिरस्मरणीय आणि वंदनीय आहे. अशा थार मातृभक्ताला मातृभूच्या स्वातंत्र्यदिनी माझे कोटी कोटी प्रणाम! 

जय हिंद!

मे ०६, २०२१

भाषणे शाळेतील मुलांसाठी भाग - 34 (मानवता हाच धर्म)


                                                         मानवता हाच धर्म 

    माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाला जसं नाव, आडनाव असतं, तसा प्रत्येकाचा एक धर्मही असतो. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, जैन , बौद्ध वगैरे-वगैरे धर्मापैकी आपला कोणता तरी एक धर्म असतो. बहुतेकांना धर्म त्यांच्या जन्मावरून मिळालेला असतो. म्हणजे आईवडिलांचा जो धर्म, तोच मुलांचा धर्म असतो. फारच थोडे लोक स्वत:चा धर्म स्वत:च निवडतात. कुठलाही धर्म म्हटलं, की धर्म संस्थापक, धर्मग्रंथ, धर्मभाषा, दैवतं, देवस्थानं, उपासनापद्धती इत्यादी गोष्टी आल्याच. रूढ अर्थानं पाहता धर्माच्या परंपरेत मानवता धर्माला वेगळं असं स्थान नाही. 

      जगातील बहुतेक राष्ट्रे बहुसंख्य लोकांच्या धर्मावरून ओळखली जातात. राज्य कोणत्याही पक्षाच असो, लोकांच्या मनावर राज्य मात्र धर्माचंच राहत आलेलं आहे. पुरोहित, पोप, मुल्ला, मौलवी हे धर्माचे ठेकेदार होऊन बसले आहेत. हजारो वर्षांपूर्वी रचल्या गेलेल्या वेद, कुराण, बायबल यांसारख्या धर्मग्रंथांना प्रमाण मानून, धर्माचे हे अडाणी ठेकेदार सामान्यजनांना जगणं मुष्किल करतात. समाजावर स्वत:चे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ते स्वत:ला प्रेषित म्हणून घेतात. धर्म हे ईश्वरनिर्मित आहेत असं सोईस्करपणे त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवलंय. धर्मग्रंथात वेळोवेळी आपल्या सोयीच्या गोष्टी घुसडल्या आणि धर्माचा आपल्या सोयीने अर्थ लावला.

       धर्मग्रंथांचे तंतोतंत पालन केलेच पाहिजे. अशा हेकट वृत्तीने समाजाला नवीन मूल्य स्वीकारण्याची संधी मिळू दिलीच नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या आईबापांना जीव द्यायला भाग पाडणारे तथाकथित विद्वान पंडित हिंदू धर्मातच होऊन गेले. प्रत्यक्ष जन्मदात्याला कैदेत टाकून, सख्ख्या भावांचे मुडदे पाडून, दिल्लीच्या सिंहासनावर आरुढ होणारा आलमगीर औरंगजेब म्हणे धार्मिक होता. 

'सौ चुहे खा के बिल्ली चली हज!" 

      जनरल झिया भुट्टोला फासावर लटकवून पाकिस्तानचं इस्लामीकरण करायला निघाले होते. धर्माच्या नावावर कहर केला तो अमर्याद सत्ता हाती असलेल्या हिटलरनं! लक्षावधी ज्यू धर्मीयांना त्याने यातना तळामध्ये छळून छळून मार मारलं! गॅस चेंबरमधील मुडद्यांची विल्हेवाट लावणं कटकटीच झालं म्हणून त्याने माणुसकीला काळिमा फासणारा असा नीच मार्ग पत्करला. ट्रक भरभरून ज्यू लोक गावाबाहेर दूरवर नेले जात. तिथ त्यांनी त्यांच्यासाठी खड्डे खणून तयार ठेवायचे. 

     आधीच्या मुडद्यांना त्यांच्या खड्यात पुरायचे. त्यानंतर आपापल्या अंगावरील कपडे, बूट, हॅट, मोजे, दागिने असे त्या त्या ढिगांवर टाकायचे आणि शेवटी नग्न होऊन, तोफेसमार अर्धवतुळाकार उभे राहायचे, मरणाची वाट पाहत. यांत एकाच कुटुंबातील मुले, आजी, आजोबा, सुना, नातवंड असायची! 

       जगात कोणता धर्म मानवाला असे अधम कृत्य करायला सांगता? 

    आपल्याकडं म्हणजे औरंगाबद, हैदराबाद, भिवंडीतल्या जातीय दंगलीत निरपराध्यांची कत्तल करणाऱ्यांना धार्मिक म्हणायचं का? पंजाबमध्ये हजारों निरपराध्यांना गोळ्या घालून ठार करणाऱ्या शीख अतिरेक्यांना धार्मिक म्हणायचं का? ही धार्मिकता नाही, तर ही आहे धर्मांधता, मित्रांनो, जगातला कोणताच धर्म असं वागायला शिकवत नाही. धम्माची निर्मितीच मुळी मानवाने मानवाच्या भल्यासाठी आणि मानवतेच्या आधारावर केली आहे. 'धारणात् धर्म' अर्थात् आपण ज्याचे धारण करतो तो आपला धर्म पक्षाचा धर्म उडण्याचा, माशाचा धर्म पोहण्याचा, तसा मानवाचा धर्म मानवतेचा. 

   'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे: 

    कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे, 

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे!" 

    सानेगुरुजींनी किती सोप्या शब्दांत सागितले आहे. सत्य, अहिंसा, संयम, दया, प्रेम, परोपकार या धर्मातील शाश्वत तत्त्वांवरच जगातला प्रत्येक धर्म उभा आहे. तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम करता तितकंच इतरांवरही करा. आपल्याला रामदासांनी तरी दुसरं काय सांगितलं आहे? "आपणास चिमटा घेतला, तणे जीव कासावीस झाला. आपणावरूनी दुसऱ्याला ओळखीत जावे!" परमेश्वर हा मंदिर, मशीद, चर्चमध्ये कधीच बंदिस्त नसतो; तर तो घाम गाळून कष्ट करणाऱ्यांच्या घरी भाकरीच्या रुपात आढळतो! 

जो श्रमतो अन् प्रार्थितो, 

जीवन प्रीतीने उजळी! 

निर्भय तो, त्याला कळते, 

प्रभू असतो त्याचे जवळी! 

  पाषाणमूर्तीना दुधा-तुपाने न्हाऊ घालणाऱ्या कर्मठांना खरा धर्म कधीच कळलेला नसतो. तो कळलेला असतो. महाराच्या पोराला कडेवर घेणाऱ्या नाथांना! तो कळलेला असतो विधवांसाठी शाळा काढणाऱ्या महर्षी कर्त्यांना. अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला करणाऱ्या जोतीबा फुल्यांना. 

      हरिजनांना मंदिर प्रवेश मिळवून देणाऱ्या सानेगुरुजींना. महारोग्यांसाठी झिजणाऱ्या बाबा आमटेंना. संत गाडगे महाराज, मदर तेरेसा, डॉक्टर कोटणीस... अशी किती तरी उदाहरणे देता येतील, की ज्यांना खरा धर्म कळलेला आहे. 

जय हिंद!

मे ०६, २०२१

भाषणे शाळेतील मुलांसाठी भाग - 33 (शिक्षण आणि संस्कार)


 शिक्षण आणि संस्कार 

      माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, शिक्षण आणि संस्कार दोन्हीही मानवी जीवनातील अत्यावश्यक गोष्टी आहेत. संस्कार जीवनाची पायाभरणी मजबूत करतात व शिक्षणामुळे मानवी जीवनाची उत्तुंग इमारत उभी राहणे शक्य होते. जीवनाची गाडी सार्थकतेच्या दिशेने जायची असेल तर तिला शिक्षण आणि संस्कार या दोन्ही चाकाची गरज आहे. 
      शिक्षण या शब्दाच्या व्यापक अर्थाकडे पाहून विचार केला तर शिक्षणातून संस्कार होतात असा आभास होतो व संस्कारातूनही शिक्षण होत असल्याची जाणीव होते. “शिलाशिवाय विद्या फुकाची आहे!" या एकाच वाक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण व संस्कार या दोन गोष्टीतील अद्वितीय संबंध स्पष्ट केला आहे. जिजाऊने शिवबाला रामायण व महाभारतातले धडे शिकवले व न्याय नीतीच्या शिक्षणाबरोबरच स्वदेश प्रेमाचा संस्कार केला. 
       कर्मवीरांनी अनेक मुलांना शिक्षण दिले परंतु शिक्षणाबरोबरच "स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" असा श्रमप्रतिष्ठेचा संस्कारही दिला. फुले दांपत्याने शिक्षणाबरोबरच समाजाला समानतेचा संस्कार दिला. शाहूंनी शिक्षणासोबतच कला-संस्कृतीचा वसा कोल्हापूरच्या मातीला बहाल केला. अशा प्रकारे संस्कार हे शिक्षणाबरोबरच जगण्यातूनही परावर्तीत होत असतात. 
      आई ही मुलाची पहिली गुरू असते व तीच संस्कारांची गाथा असते. मुलाच्या इवल्याशा हाताला धरून त्याला चालायला शिकवणाऱ्या मातेने आपल्या मुलाला जीवनाच्या मार्गावरून चालताना उपयोगी पडतील असे संस्कारही दिले पाहिजेत. शालेय शिक्षणातून माणसाच्या जीवनाला आकार यावा अशी सार्थ अपेक्षा आहे आणि म्हणूनच शालेय शिक्षणाच्या क्षणा-क्षणातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार होणे अभिप्रेत आहे. 
     शाळेच्या परिपाठातून सदविचार आणि सदाचाराचा संस्कार होतो. इतिहासाच्या पाना-पानांतून राष्ट्रभक्तीचा संस्कार होतो. भाषाविषयातून अभिव्यक्तीचा आणि गणितातून व्यवहारी वृत्तीचा संस्कार होतो. म्हणूनच शिक्षकाने शिक्षणाच्या प्रवाहाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्कारांची देण बहाल करावी. शालेय शिक्षणाबरोबरच मानवी जीवनाशी संबंधित समाजातील अनेक गोष्टी मानवी मनावर परिणाम करतात. 
      संस्कारांचा वसा व शिक्षणाचा ठसा उमटलेल्या मनुष्याने कुसंस्कारापासून आपल्या मनाचा कानाकोपरा दूर ठेवावा. उच्चशिक्षित तरुण आज समाजामध्ये विघातक कृत्ये करताना दिसतात. म्हणूनच व्यावहारिक शिक्षणाला संस्काराची जोड देणे आज गरजेचे आहे. तसे झाल्यासच शिक्षणाचा मूळ उद्देश सार्थ ठरेल व मानवी जीवन सफल होईल! 
जय हिंद...
मे ०६, २०२१

भाषणे शाळेतील मुलांसाठी भाग - 32(अंधश्रद्धा : एक सामाजिक कलंक)


  अंधश्रद्धा : एक सामाजिक कलंक 

    माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, असे म्हणतात की, जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्माला सुरुवात होते, मी त्याच्याही पुढे जाऊन असे म्हणेन की, जिथे अध्यात्म संपते व श्रद्धेचा शेवट होते तिथेच अंधश्रद्धेला सुरुवात होते.
        आजच्या परिस्थितीत अंधश्रद्धा हा भारतीय समाजमनाला लागलेला फार मोठा कलंक आहे, असे म्हणणे निश्चितच उचित असेल. प्राचीन काळी निसर्गाची पूजा करणारा मान हळूहळू मंदिरातील दगडी मूर्तीची पूजा करू लागला. नैवेद्याची संकल्पना भोळ्या माणसांच्या श्रद्धेला कोंबड्या, बकऱ्याच्या बळीपर्यंत घेऊन गेली. दारिद्र्याने पिचलेल्या माणसांना महागड्या वैद्यापेक्षा अंगारा देणारा बाबा सोयीस्कर वाटू लागला. अशा प्रकारे रूढी, परंपरा, अज्ञान, दारिद्र्य अशा अनेक कारणांमुळे समाजातील खतपाणी मिळाले.
       एक छोटीशी वाळवी पाहता-पाहता संपूर्ण लाकूड पोखरून काढते. त्याचप्रमाणे समाजाला लागलेल्या अंधश्रद्धारूपी वाळवीने समाज पोखरण्यास सुरुवात केली आहे. अंधश्रद्धेच्या या एका छोट्याशा रोपट्याचा आता मोठा वटवृक्ष तयार झाला आहे. आणि याच वृक्षाच्या गर्द छायेखाली अनेक भोंदू बुवा अनेक देवांसह आपले दुकान टाकून बसले आहेत. कुणाचा गणपती दूध पिऊ लागला आहे. 
       कुणी बाबा कानाला हात लावून देवाला फोन लावत आहे.रूढी परंपरांना छेद देणाऱ्या छ. शाहूंच्या कोल्हापरमध्ये देवीची मूर्ती आणि गुप्त धनासाठी प्रचंड उत्खनन होत आहे. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कोबड्या-बकऱ्यांचे बळी दिले जातात, रक्ताचा सडा पडतो. मांसाचा चिखल होतो. यातच आणखीन भर म्हणजे काही ठिकाणी नरबळीही दिला जातो. 
      माणूसकीला काळीमा फासतील असे प्रकार अंधश्रद्धेतून होत आहेत. एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जयजयकार करणारी माणसे दुसरीकडे मात्र अंधश्रद्धेला बळी पडतात. आमचा समाज जर अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला असेल तर २०२० साली महासत्ता बनण्याचे भारताचे स्वप्न हे स्वप्रच राहील. म्हणून भारतीय समाजाला लागलेला अंधश्रद्धेचा कलंक धुऊन काढणे गरजेचे आहे. कारण, याच अंधश्रद्धेमुळे अमानी माणूस आणखीच अज्ञानी बनत आहे.
         दारिद्र्याने बेजार झालेला गरीब अंधश्रद्धेच्या वणव्यामध्ये होरपळून निघत आहे. अंधश्रद्धेतून घडणाऱ्या गलिच्छ व अस्वच्छ प्रकारांमुळे वैयक्तिक व सामाजिक अनारोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सर्वप्रथम समाजातील अज्ञान नाहिसे केले पाहिजे. शिक्षणाचा सर्वत्र प्रसार झाला पाहिजे. जुन्या रूढी नष्ट केल्या पाहिजेत. त्यासाठी फुले, कर्वे, आगरकरांच्या विचारांची देशाला गरज आहे. कबिरांचे दोहे पुन्हा समाजाला सांगायला हवेत. 
      संतांनी दिलेले मानवतेचे संदेश लोकांच्या मनामध्ये रुजले पाहिजेत. संत गाडगेबाबंनी दिलेले विचार समाजाच्या कृतीतून प्रवाहित झाले पाहिजेत.
     ग्रामस्वच्छता अभियानाद्वारे केवळ गावातील घाण साफ करून भागणार नाही, तर गावातील माणसांच्या मनाला लागलेली अंधश्रद्धेची घाणही स्वच्छ करायला हवी, तरच अभियान सफल होईल अन् समाजाच्या मनातील अंधश्रद्धेची घाण दूर जाईल. 
जय हिंद!

Breaking